धनश्री लॉजवर पुन्हा पोलिसांचा धडक छापा; देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

धनश्री लॉजवर पुन्हा पोलिसांचा धडक छापा; देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई; लॉज चालक जेरबंद, सात महिलांची सुटका, एक हजारांची रोख रक्कम व मुद्देमाल जप्त

दौंड,

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाखारी (ता. दौंड) येथील धनश्री लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापार रॅकेटचा यवत पोलिसांनी पुन्हा एकदा पर्दाफाश केला आहे. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या या धडक कारवाईत लॉज चालक विनयकुमार रवींद्र हेगडे (वय ४०, मूळ रा. उडपी, कर्नाटक) याला अटक करण्यात आली असून, विविध राज्यांतील सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक संतोष तायशिंगकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला.

बनावट ग्राहकाने लॉजमध्ये जाऊन महिलेची मागणी केली. त्यासाठी एक हजार रुपये दिल्यानंतर पूर्वनियोजित इशारा देताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. प्राथमिक तपासात लॉज चालक महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे उघड झाले. चौकशीत ग्राहकाकडून घेतलेल्या एक हजार रुपयांपैकी ५०० रुपये महिलेला देऊन उर्वरित ५०० रुपये स्वतःकडे ठेवत असल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान विविध राज्यांतील सात महिलांची सुटका करण्यात आली. तसेच बनावट ग्राहकाने दिलेली एक हजार रुपयांची रक्कम आणि कंडोमचे पाकीट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र संभाजी चांदणे यांनी सरकारतर्फे यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे करीत आहेत.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई

विशेष म्हणजे, १८ मे रोजीही यवत पोलिसांनी याच धनश्री लॉजवर छापा टाकून १० पीडित महिलांची सुटका केली होती. त्या कारवाईत प्रदीप बाबू पुजारी (मूळ रा. उडपी, कर्नाटक) आणि शहबाज सिराज सय्यद (रा. वरवंड, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच लॉजमध्ये पुन्हा देहव्यापार सुरू असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दुसऱ्यांदा धडक कारवाई केली.

दोन महिन्यांत एकाच लॉजवर दोन वेळा कारवाई होऊनही पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाल्याने संबंधितांमध्ये कायद्याची भीती उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा लॉजना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत आणि संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार शोधून काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!