
महापालिकेच्या शाळांतील स्वच्छतेचा बोजवारा; १,५०० विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
चार महिन्यांपासून स्वच्छता साहित्याचा तुटवडा; दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी
पुणे,
पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रातील शाळांमधील स्वच्छतेच्या कामाबाबत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. धायरी येथील वस्ताद हरिभाऊ पोकळे महापालिका शाळेत गेल्या चार महिन्यांपासून ॲसिड, फिनेल आणि इतर आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले आहे. सुमारे १,५०० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत अशी परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मार्च २०२६ पासून सिंहगड रस्ता क्षेत्रातील महापालिका शाळांच्या स्वच्छतेचे काम लोकराज्य विकास ग्रुप या ठेकेदार संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळांमध्ये स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याने शाळेच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर बाबीकडे संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. स्वच्छता साहित्याच्या अभावामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्य मागण्या
- या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
- चार महिन्यांपासून स्वच्छता साहित्य उपलब्ध का झाले नाही, याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
- करारातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
- संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत (Black List) टाकण्यात यावे.
- पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये तातडीने आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई नेमकी कधी होणार? कराराचे उल्लंघन करूनही संबंधित संस्थेला अभय का दिले जात आहे? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पालक, नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातून जोर धरत आहे.

