एक कोटींच्या ड्रेनेज सफाईचा दावा फोल ; डीपी रोडवर सांडपाण्याचा पूर

एक कोटींच्या ड्रेनेज सफाईचा दावा फोल ; डीपी रोडवर सांडपाण्याचा पूर

सिद्धेश्वर हॉटेलसमोर पावसात ड्रेनेज तुंबले; कामाच्या गुणवत्तेवर आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न

पुणे, हडपसर : हडपसर डीपी रोडवरील सिद्धेश्वर हॉटेलसमोर आज झालेल्या पावसामुळे ड्रेनेज तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. पहिल्याच पावसात ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याने हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाले व ड्रेनेज साफसफाईसाठी सुमारे एक कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आले होते. मात्र, माळवाडी परिसरातील ड्रेनेजची प्रभावी साफसफाई न झाल्यानेच सांडपाणी रस्त्यावर आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, ड्रेनेज साफसफाईच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या ज्युनिअर अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासली होती का? पुणे महापालिकेने अशा कामांसाठी निश्चित केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) नुसार काम झाले का? असा सवाल उपस्थित होत आहे.

टेंडरच्या अटींनुसार ड्रेनेज साफसफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा अहवाल (Completion Report) सादर करणे बंधनकारक असते. तसेच साफसफाईपूर्वी व साफसफाईनंतरचे छायाचित्रे (Before–After Photos) सादर करणे आवश्यक असते. संबंधित कंत्राटदाराने ही प्रक्रिया पूर्ण केली होती का? आणि ज्युनिअर अभियंत्यांनी त्याची प्रत्यक्ष पडताळणी केली होती का? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

याशिवाय, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्णत्वाचा अहवाल व छायाचित्रांसह माहिती सादर केली होती का? जर केली असेल, तर प्रत्यक्ष परिस्थिती आणि कागदोपत्री अहवालात एवढी तफावत का दिसून येते? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, कागदोपत्री ड्रेनेज साफसफाई पूर्ण झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात कामात हलगर्जीपणा झाला असेल, तर हा केवळ निष्काळजीपणाचा नव्हे तर सार्वजनिक निधीच्या वापरावरही गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे.

नागरिकांची मागणी

  • एक कोटींच्या टेंडरची स्वतंत्र चौकशी करावी.
  • संबंधित कंत्राटदार, ज्युनिअर अभियंता आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी.
  • SOP नुसार काम झाले की नाही, याची चौकशी करावी.
  • पूर्णत्वाचे अहवाल, छायाचित्रे आणि मोजमाप पुस्तिका (Measurement Book) सार्वजनिक करावी.
  • दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.

पहिल्याच पावसात ड्रेनेज व्यवस्था फेल ठरत असेल, तर कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कुठे झाला? हा प्रश्न आता केवळ नागरिकांचाच नाही, तर महापालिकेच्या पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!