विकास आराखड्यात रस्ते कागदावरच; 9 वर्षांपासून रुंदीकरण रखडले

विकास आराखड्यात रस्ते कागदावरच; 9 वर्षांपासून रुंदीकरण रखडले

शाळा, टॉवर्स, मॉल्स वाढले… पण रस्ते तेच! उंड्री-महम्मदवाडीत वाहतूक कोंडीचा स्फोट, प्रशासन मात्र ‘झोपेत’

उंड्री-

उंड्री-महम्मदवाडी परिसरातील वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी ठरत आहे. एका बाजूला हजारो नवीन घरे, मोठमोठ्या सोसायट्या, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संकुले उभी राहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गेल्या 9 वर्षांपासून रस्ते मात्र जसेच्या तसेच आहेत. नियोजनशून्य नागरीकरण आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका दररोज हजारो नागरिकांना बसत आहे.

सकाळी आणि दुपारी शाळांच्या वेळेत पुणेकर चौक, बिशप स्कूल चौक आणि उंड्री चौक येथे अक्षरशः वाहनांचा महासागर उसळतो. शाळेच्या बस, पालकांची वाहने, आयटी कर्मचारी, बांधकाम साहित्य वाहून नेणारे ट्रक आणि स्थानिक नागरिक यामुळे रस्त्यांवर तासन्तास कोंडी होते.

पुणेकर चौक, बिशप स्कूल चौक,उंड्री चौक या तिन्ही चौकांमध्ये दिवसातून अनेकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याचे चित्र आहे.उंड्री-महम्मदवाडी परिसरात गेल्या दशकभरात हजारो सदनिका उभारल्या गेल्या. आजही मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून जड वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनसंख्येचा विचार करून आवश्यक रस्ते, पर्यायी मार्ग किंवा वाहतूक सुविधा उभारण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

रस्त्यालगतच्या अनेक व्यावसायिक आस्थापनांनी फ्रंट मार्जिन आणि पदपथांवर अतिक्रमण केले आहे. परिणामी ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी संकुचित होऊन वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे.

विकास आराखड्यातील रस्ते फक्त कागदावरच?

महापालिकेच्या विकसित आराखड्यात (डीपी) अनेक नवीन रस्ते आणि जोडरस्ते प्रस्तावित आहेत. मात्र त्यापैकी किती रस्त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आणि किती रस्ते नागरिकांच्या वापरासाठी खुले झाले, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

नागरिकांचे थेट सवाल

  • विकसित आराखड्यात दाखवलेले रस्ते प्रत्यक्षात वापरासाठी कधी उपलब्ध होणार?
  • महम्मदवाडी-उंड्री रस्ता रुंदीकरणाचे काम नेमके कधी सुरू होणार?
  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांची कामे कधी हाती घेतली जाणार?
  • कोंढवा-मंतरवाडी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव नेमका कोणत्या टप्प्यावर आहे?
  • नवीन गृहप्रकल्पांना परवानग्या देताना पायाभूत सुविधांची अट का घालण्यात आली नाही?
  • दररोज कोंडीत अडकणाऱ्या हजारो नागरिकांच्या वेळेची आणि आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?

वाहतूक कोंडीच्या प्रमुख ठिकाणी पुरेशा प्रमाणात वाहतूक पोलीस नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. चौकांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत नसल्याने कोंडी वाढत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.

नागरिकांच्या मागण्या

  • महम्मदवाडी-उंड्री रस्त्याचे तातडीने रुंदीकरण
  • कोंढवा-मंतरवाडी रस्ता रुंदीकरणाला गती
  • विकसित आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांची त्वरित अंमलबजावणी
  • पर्यायी रस्त्यांचे काम तातडीने सुरू करणे
  • अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे
  • शाळांच्या वेळेत विशेष वाहतूक नियोजन
  • चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती

उंड्री-महम्मदवाडी परिसरातील नागरिक आता आश्वासनांना कंटाळले आहेत. विकास आराखड्यातील रस्ते, रुंदीकरणाचे प्रस्ताव आणि पर्यायी मार्गांची घोषणा यापलीकडे प्रत्यक्षात काय झाले, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा “विकास” या नावाखाली वाढणाऱ्या काँक्रीटच्या जंगलात वाहतूक कोंडीचे संकट आणखी भीषण होणार असून नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!