महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण इमारत रिकामी

महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण इमारत रिकामी

पुणे : पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा संदेश प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली.

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. अवघ्या दहा मिनिटांत महापौर कार्यालयासह संपूर्ण मुख्य इमारत रिकामी करण्यात आली. अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर धाव घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानंतर सुरक्षा यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. संपूर्ण महापालिका भवनातील सर्व विभाग रिकामे करण्यात आले असून सर्व प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या कर्मचारी आणि अधिकारी मुख्य गेटबाहेर थांबविण्यात आले असून नागरिकांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला असून महापौर कार्यालय, आयुक्तांचे दालन आणि इमारतीतील प्रत्येक संवेदनशील विभागाची कसून तपासणी सुरू आहे.

शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत महापालिकेचे नियमित कामकाज स्थगित ठेवण्यात आले आहे. धमकीचा ई-मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठविला याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे महापालिका परिसरात मोठी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!