
पुणे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची नाराजी
पुणे, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचे सूर उमटले आहेत. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
जगताप यांनी सांगितले की, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेस पक्षाची मतदारसंख्या सर्वाधिक असूनही महाविकास आघाडीतील जागावाटपात मोठेपणाची भूमिका घेत काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली होती. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील १७ जागांपैकी पुणे आणि सातारा या दोन जागांवर आग्रह धरल्यामुळे काँग्रेसने त्यांचा दावा मान्य केला होता.
मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ऐनवेळी श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात बोलताना जगताप म्हणाले की, “ही जागा काँग्रेसने लढवली असती तर भाजप आणि महायुतीविरोधात प्रभावी लढत उभी राहिली असती. मात्र राष्ट्रवादीने उमेदवार उभा करून अखेरीस माघार घेतल्याने काँग्रेसची फसवणूक झाली आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांपेक्षा काँग्रेसची ताकद या मतदारसंघात अधिक होती. तरीदेखील आघाडी धर्म पाळत काँग्रेसने जागा सोडली. परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या विश्वासाला तडा गेला असल्याची भावना पक्षामध्ये आहे.
दरम्यान, श्रीकांत पाटील यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि भविष्यातील जागावाटपाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशांत जगताप यांनी यापुढे काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका अधिक ठामपणे मांडेल, असे संकेतही दिले.

