‘निरा’ बस पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड; पीएमटी चालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

‘निरा’ बस पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड; पीएमटी चालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

हडपसर :

हडपसर–जेजुरी मार्गावर पीएमटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सासवड येथे ‘निरा’कडे जाणाऱ्या बसची सुमारे तासभर प्रतीक्षा केल्यानंतर काही प्रवाशांनी जेजुरीची बस पकडली. जेजुरी येथे उतरून निराची बस पकडण्याचे त्यांनी ठरविले होते. मात्र, प्रवासादरम्यान निराकडे जाणारी बस मागून येताना दिसूनही जेजुरी बसच्या चालकाने प्रवाशांच्या विनंतीनंतरही सहकार्य केले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

जेजुरीच्या बसमध्ये सुमारे १५ ते २० प्रवासी होते. निरा बस मागून येताना दिसल्यानंतर काही प्रवासी चालकाजवळ गेले आणि पुढील बसमध्ये जाता यावे यासाठी बस थोडी पुढे नेऊन थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बसचा वेग आणि अपघाताचा धोका असल्याचे सांगून त्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, एका थांब्यावर प्रवासी घेण्यासाठी निरा बस थांबली. त्यावेळी जेजुरी बसला पुढे जाऊन त्या बसजवळ थांबण्याची संधी होती. मात्र, चालकाने तसे केले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

याबाबत प्रवाशांनी जाब विचारल्यानंतर बसचा वेग कमी करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बसमध्ये मोठे अंतर निर्माण झाले. अपघाताचा धोका नको म्हणून प्रवाशांनीही परिस्थिती समजून घेतली. मात्र, पुन्हा एका थांब्यावर निरा बस पकडण्याची संधी असतानाही ती दवडण्यात आली. विशेष म्हणजे निरा बस दिसेनाशी झाल्यानंतर जेजुरी बसचा वेग वाढविण्यात आला. त्यामुळे ‘बसचा वेग वाढविण्याची भीती तेव्हा नव्हती का?’ असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, त्यांना केवळ वेळेत इच्छित स्थळी पोहोचायचे होते.

चालकाने सुरक्षिततेचे नियम पाळावेत, याबाबत कोणतीही हरकत नाही; मात्र सुरक्षित संधी उपलब्ध असतानाही प्रवाशांना सहकार्य न करणे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पीएमटी प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन चालकांना प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत शक्य ते सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!