
शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन
पंढरपूर, देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा विधीवत संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संतांच्या अभंगातील “साधुसंतजना करितों प्रार्थना, भेटवा देवराणा द्वारकेचा… तनमन प्राण वेधले त्याचे पायीं, येऊनियां राही ह्रदयकमळीं” या ओळींचा उल्लेख करत विठ्ठलभक्तीची भावना व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवक तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. तसेच राज्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि भरभराट कायम राहावी, अशीही प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी अर्पण केली.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भक्तिमय वातावरणात शासकीय महापूजेचा सोहळा पार पडला.

