
ढोल-ताशांच्या गजरात हडपसर ससाणेनगरमध्ये गणरायाचे आगमन
राजमुद्रा, मोरया, नेहरू मंडई, स्वराज्य मंडळांच्या मिरवणुका; कोब्रा किंग, तात्या विंचू ठरले आकर्षण
हडपसर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ससाणेनगर परिसरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा निनाद, बँडचे वादन आणि विविध आकर्षणांमुळे मिरवणुकांना उत्सवी स्वरूप आले. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांची मोठी उपस्थिती होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून मिरवणुकीतील देखावे आणि गणेशमूर्तीचे दर्शन घेत होते.
राजमुद्रा मित्र मंडळ ट्रस्टचा यंदा २८ वा गणेशोत्सव आहे. मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली.

मोरया मित्र मंडळाचा यंदा नववा गणेशोत्सव आहे. अध्यक्ष सत्यम घुमटकर यांच्या नेतृत्वाखाली बँडच्या साथीने गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली.
हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू मंडई गणेश मंडळाचा यंदा ३९ वा गणेशोत्सव आहे. अध्यक्ष हितेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली बँडच्या वादनासह मिरवणूक काढण्यात आली. मंडळाने केलेली आकर्षक विद्युत रोषणाई मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
स्वराज्य मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. श्रींची मूर्ती आकर्षक लाकडी रथात विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली.
कोब्रा किंग, तात्या विंचूभोवती छायाचित्रांसाठी गर्दी
स्वराज्य मित्र मंडळाच्या मिरवणुकीत ‘कोब्रा किंग’ आणि ‘तात्या विंचू’ यांचे वेश परिधान केलेले कलाकार सहभागी झाले होते. त्यांच्या वेषभूषेने लहान मुलांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मुलांनी कलाकारांच्या भोवती गर्दी केली, तर त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकही पुढे येत होते. काही वेळ मिरवणुकीच्या मार्गावर या आकर्षणाभोवती नागरिकांची वर्दळ वाढली होती.
मिरवणूक पुढे सरकत असताना नागरिकांकडून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यात येत होता. ढोल-ताशांचा निनाद ऐकण्यासाठी आणि गणरायाच्या आगमनाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांची उपस्थिती मिरवणूक पुढे जाईपर्यंत कायम होती. त्यामुळे ससाणेनगरच्या मुख्य रस्त्यावर गणेशोत्सवाच्या आगमनाचा उत्सवी माहोल दिसून आला.

