
पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी
हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात गळती; टाकीची संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी
हडपसर : हडपसरमधील १५ नंबर परिसरातील गंगानगर–गंगाधाम स्मशानभूमीजवळ, बनकर शाळेजवळ असलेल्या महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे महापालिकेचे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गळतीचे मूळ कारण शोधण्याची गरज
टाकीतून सातत्याने पाणी झिरपत असल्याने गळती नेमकी टाकीच्या भिंती, तळ, बांधकामातील सांधे किंवा जलरोधक थरातून होत आहे का, याची तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकाळ गळती राहिल्यास काँक्रीटची झीज, भेगा तसेच लोखंडी सळ्यांना गंज लागण्याची शक्यता असल्याने टाकीच्या बांधकामाची सुरक्षितता तपासणे गरजेचे आहे.
भानगिरे यांची संरचनात्मक तपासणीची मागणी
या प्रकाराची तातडीने दखल घेऊन पाण्याची गळती बंद करण्याबरोबरच टाकीची संरचनात्मक सुरक्षितता तपासणी तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
“पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया जाणे गंभीर आहे. प्रशासनाने केवळ गळती थांबविण्यापुरती कार्यवाही न करता टाकीच्या बांधकामाची सुरक्षितताही तपासावी. संरचनात्मक तपासणी करून तांत्रिक अहवालाच्या आधारे कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने आत्ताच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी भानगिरे यांनी केली.
महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
पाण्याची नासाडी तातडीने थांबविणे, गळतीचे मूळ कारण शोधणे, टाकीची संरचनात्मक सुरक्षितता तपासणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे, या सर्व बाबींवर महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

