
तहसीलदारांच्या दालनातील छत नादुरुस्त; शासकीय दस्तऐवजांच्या सुरक्षेचा प्रश्न
पुणे खडकमाळ आळी येथील हवेली तहसीलदार कार्यालयात पावसाच्या पाण्याची गळती; नागरिकांची गैरसोय
पुणे : खडकमाळ आळी येथील हवेली तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार नागरिकांना भेटतात त्या दालनातच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दालनाचे छत नादुरुस्त झाल्याचे दिसून येत असून, पावसाळ्यात या ठिकाणी पाणी गळतीची समस्या निर्माण होत आहे.
हवेली तालुक्यातील विविध गावांमधून महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक आपल्या विविध कामांसाठी या कार्यालयात येतात. याच ठिकाणी नागरिकांच्या सुनावण्या घेतल्या जातात तसेच विविध अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तहसीलदारांच्या दालनातील गळतीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, तहसीलदार कार्यालयात महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आणि अभिलेख मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले असतात. पावसाचे पाणी गळतीमुळे या दस्तऐवजांचे नुकसान होण्याची शक्यता असून, त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भव्य प्रशासकीय इमारत उभी; उद्घाटन कधी?
दरम्यान, जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी भव्य प्रशासकीय कार्यालयाची इमारत उभी राहिली आहे. मात्र या नवीन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन कधी होणार आणि ते पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेसाठी कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत ‘महाराष्ट्र नामा’च्या प्रतिनिधींनी हवेली तालुका तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांची भेट घेतली असता, नवीन प्रशासकीय कार्यालय केव्हा सुरू होणार याबाबत आमच्याकडे अद्याप कोणतीही माहिती आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जुन्या कार्यालयातील गळतीची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची तसेच महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांची गैरसोय व संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

