
मॉडिफाईड सायलेन्सरविरोधातील कारवाईचे नागरिकांकडून स्वागत
हडपसर :
बेकायदा मॉडिफाईड सायलेन्सर बसवून रात्रीच्या वेळी कर्णकर्कश आवाज करत दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात काळेपडळ पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईचे ससाणेनगर, काळेपडळ, मोहम्मदवाडी रोड, हांडेवाडी रोड परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. नागरिकांच्या वतीने पोलिसांना लेखी पाठिंबा देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट व इतर दुचाकींच्या मोठ्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच आजारी रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, वाहतूक नियमांचेही उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत काळेपडळ पोलिसांनी बेकायदा मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई सुरू केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशा प्रकारांवर यापुढेही सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
यावेळी वैभव माने म्हणाले, “पोलीस दलाचे काम केवळ गुन्हे उघडकीस आणण्यापुरते मर्यादित नसून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रत्येक कायदेशीर उपक्रमाला नागरिकांचा पाठिंबा राहील.”
काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबर यांनी उपस्थित नागरिकांच्या सोसायट्यांमधील विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पोलिसांच्या कारवाईला पाठिंबा देत सत्कार केल्याबद्दल वैभव माने, फोश सोसायटी संघटना, विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी व नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
बैठकीस फोश मधील ड्रीम्स आकृती, गंगा व्हिलेज, पेबल पार्क, यशरवी पार्क, समृद्धी, वर्धमान, ४८ ईस्ट, ड्रीम्स आशियाना, इशा इताशा एम्पायर, व्यंकटेश क्लासिक, रिदम काउंटी, यशराज, सत्यम निरंजनी, सिंपली सिटी, सेलेन पार्क, फिफ्थ अॅव्हेन्यू, एलिना यांसह विविध सोसायट्यांमधील नागरिक, प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
“सुरक्षित समाज, सक्षम पोलीस आणि जागरूक नागरिक—हीच सुजाण लोकशाहीची खरी ताकद,” असा सूर यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

