भूमी ग्रीन कंपनीचे कचरा व्यवस्थापन टेंडर तात्काळ रद्द करा

भूमी ग्रीन कंपनीचे कचरा व्यवस्थापन टेंडर तात्काळ रद्द करा

पुणे :

पुणे महानगरपालिकेने भूमी ग्रीन कंपनीला दिलेले कचरा व्यवस्थापनाचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अरविंद शिंदे यांनी “कचऱ्यावर पोसलेला भूमी ग्रीनचा भ्रष्टाचार” असा मजकूर असलेला प्रतीकात्मक बॅनर पुणे महानगरपालिका आयुक्त राम किशोर नवल यांना दाखवत कंपनीला दिलेले टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. तसेच कचरा व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, कचरा व्यवस्थापनाच्या टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता नसून शहराच्या स्वच्छता व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करून नव्याने पारदर्शक आणि स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी “भूमी ग्रीन हटाव, पुणे वाचवा”, “कचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचार थांबवा” अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन टेंडर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान काही काळ स्थायी समिती सभागृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले.

मुख्य मागण्या :

  • भूमी ग्रीन कंपनीला दिलेले कचरा व्यवस्थापनाचे टेंडर तात्काळ रद्द करावे.
  • संपूर्ण टेंडर प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.
  • नव्याने पारदर्शक आणि स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी.
  • पुणेकरांना दर्जेदार, पारदर्शक व प्रभावी कचरा व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून द्यावी.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!