तक्रारीनंतरही राडारोडा कायम; महात्मा फुले क्रीडा संकुलात घाणीचे साम्राज्य

तक्रारीनंतरही राडारोडा कायम; महात्मा फुले क्रीडा संकुलात घाणीचे साम्राज्य

जूनमध्ये लेखी तक्रार करूनही कारवाई नाही; मातीच्या ढिगाऱ्यावरच कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी, नागरिक संतप्त

हडपसर : ससाणे नगर येथील पुणे महापालिकेच्या महात्मा फुले क्रीडा संकुल परिसरात मैदान सपाटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर टाकण्यात आलेली माती, राडारोडा आणि बांधकामाचा मलबा अद्यापही उचलण्यात आलेला नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी जून महिन्यात लेखी तक्रार करूनही महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मैदान सपाटीकरणाचे काम झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने परिसराची स्वच्छता न करता मातीचे ढिगारे तसेच राडारोडा जागेवरच सोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यात भर म्हणजे घनकचरा विभागाचे सफाई कर्मचारीही या मातीच्या ढिगाऱ्यावरच कचरा टाकत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी जून महिन्यातच महापालिकेकडे लेखी तक्रार करून तातडीने राडारोडा हटवून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली होती. मात्र, तक्रारीनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

“तक्रार करूनही राडारोडा हटवला जात नाही. मातीच्या ढिगाऱ्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत पुणे महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे वरिष्ठ अभियंता सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की “नागरिकांच्या सर्व तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्यात येतील. संबंधित ठिकाणाची पाहणी करून राडारोडा हटविण्यासह आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,”

मात्र, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आता प्रत्यक्ष कारवाई कधी होते, याकडे ससाणे नगरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!