
अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल अनिवार्य, कचरा प्रक्रिया ठेक्याला मंजुरी
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत शहराच्या प्रशासन, स्वच्छता, दिव्यांग कल्याण आणि नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी दरमहा स्थायी समितीसमोर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, शहरातील सुका कचरा प्रक्रियेसाठी ६ कोटी ८३ लाख ६४ हजार रुपयांच्या ठेक्यालाही मंजुरी देण्यात आली.
बैठकीत शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ३०० मेट्रिक टन सुका कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी ठेका मंजूर करण्यात आला. तसेच जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील दुरुस्तीअभावी बंद असलेले मेकॅनिकल पार्किंग तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
समाज विकास विभागाच्या वतीने शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयात दिव्यांगांसाठी डे-केअर सेंटर सुरू करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणा आय फाउंडेशन या संस्थेची निवड करण्यात आली.
याशिवाय, महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील जुनी नोंदणी प्रणाली नवीन सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) मध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरातील स्मशानभूमी केंद्रांचा पुढील २५ वर्षांचा एकात्मिक मास्टर प्लॅन तयार करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीने घेतला. या निर्णयांमुळे महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, नियोजन आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

