जोगेश्वरी कॉलनीत घाण पाण्यातून शाळेत जाण्याची वेळ

जोगेश्वरी कॉलनीत घाण पाण्यातून शाळेत जाण्याची वेळ

पुणे : हडपसर परिसरातील काळे बोराटे नगर येथील जोगेश्वरी कॉलनीमध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. परिसरातील चेंबरची नियमित साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी निचरा न होता रस्त्यावर गुडघाभर साचत आहे. त्यामुळे येथील खाजगी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच घाणेरड्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

साचलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याने दुर्गंधी पसरत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या पाण्यातून दररोज ये-जा करणाऱ्या मुलांना त्वचेचे विकार, खाज आणि अॅलर्जीचा त्रास होत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून चेंबरची साफसफाई किंवा पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने चेंबरची साफसफाई करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि पालकांकडून होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!