ऐतिहासिक हडपसर वेस मार्ग अखेर वाहनांसाठी बंद

ऐतिहासिक हडपसर वेस मार्ग अखेर वाहनांसाठी बंद

मना न्युज नेटवर्क
हडपसर,

हडपसर गावाच्या मध्यवर्ती भागातून जाणारा ऐतिहासिक हडपसर वेस मार्ग हा अनेक दशकांपासून नागरिकांसाठी मुख्य दळणवळणाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. वाढत्या वाहतूक कोंडीचे कारण देत हडपसर वाहतूक विभागाने हा मार्ग अचानक बंद केला. मात्र या निर्णयामागे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात हडपसरमधील रस्ते अपुरे पडत आहेत. सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची जीवघेणी कोंडी होत असताना प्रशासनाने मूळ समस्यांवर उपाय करण्याऐवजी थेट रस्ता बंद करण्याचा सोपा मार्ग स्वीकारला आहे.

गांधी चौक, मनोहर क्लॉथ सेंटर, मंत्री मार्केट कॉर्नर, ससाणे नगर रस्ता आणि गाडीतळ चौक येथे अनेक बेकायदेशीर रिक्षाचालक विनापरवाना व्यवसाय करतात. रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

अनेक ठिकाणी पथारी व्यावसायिकांनी पादचारी मार्ग आणि रस्ते व्यापले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. हडपसर क्षेत्रीय कार्यालय आणि अतिक्रमण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोणतीही पूर्वसूचना नाही, जनजागृती नाही; वाहतूक विभागाच्या निर्णयाने बारा वाड्यांतील नागरिक संतप्त

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुणे, सोलापूर आणि सासवडला जोडणारा ऐतिहासिक हडपसर वेस मार्ग हडपसर वाहतूक विभागाने सोमवारी सकाळी अचानक वाहनांसाठी बंद केला. कोणतीही पूर्वकल्पना, पर्यायी व्यवस्था किंवा जनजागृती न करता घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण हडपसर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

ससाणे नगर, काळे बोराटे नगर, सय्यदनगर, चिंतामणी नगर, सातव नगर, ससाणे वस्ती, वाडकर मळा, जाधव मळा, महमंदवाडीसह बारा वाड्यांतील हजारो नागरिक, दुचाकीस्वार आणि व्यावसायिकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. “पर्यायी रस्ते सुरू न करता थेट रस्ता बंद करणे म्हणजे नागरिकांना वेठीस धरणे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पर्यायी रस्ते, मिसिंग लिंक रस्ते आणि विकास आराखड्यातील रस्ते प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार?
डी-मार्टजवळील अर्धवट पूल, ३२ नंबर शाळेजवळील डीपी रस्ता तसेच राम मनोहर उद्यानाजवळील उड्डाणपूल यांची कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून कामे सुरू करावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.


हडपसर वेस मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना मंत्री मार्केटमार्गे मोठा वळसा घालून हडपसर गावात प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे इंधन खर्च, वेळ आणि वाहतूक कोंडीत मोठी वाढ होणार आहे.
विशेषतः मंत्री मार्केट परिसरात आधीच बेकायदेशीर रिक्षा आणि अनधिकृत व्यावसायिकांमुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आता त्यात आणखी भर पडणार असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, ग्राहकांना बाजारपेठेत पोहोचणे कठीण होईल. परिणामी व्यवसायावर थेट परिणाम होणार असून आर्थिक फटका बसणार आहे.

हडपसर वाहतूक विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, दुचाकीस्वार आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीची मूळ कारणे दूर करण्याऐवजी ऐतिहासिक रस्ता बंद करून प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. आता प्रशासन नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णयाचा पुनर्विचार करणार का, की हडपसरकरांना कायम वाहतूक कोंडी आणि त्रास सहन करावा लागणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक करणकोट म्हणाले की रोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात उलट्या दिशेने दुचाकीस्वार हडपसर वेशी मध्ये प्रवेश करतात त्यामुळे गांधी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग बंद केला आहे. उलट्या दिशेने प्रवास करू नये.
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )