अदानीप्रेमापोटी पुणेकरांवर स्मार्ट मीटरची सक्ती; सरकार विरोधात एल्गार

अदानीप्रेमापोटी पुणेकरांवर स्मार्ट मीटरची सक्ती; सरकार विरोधात एल्गार

पुणे : राज्यातील फडणवीस सरकारने अदानी समूहाच्या हितसंबंधांसाठी सामान्य जनतेवर स्मार्ट मीटर लादण्याचा घाट घातला असून, हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकणारा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. वीज ग्राहकांची आर्थिक लूट करण्यासाठीच स्मार्ट मीटर योजना राबवली जात असल्याचा दावा करत काँग्रेसने या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे.

“स्मार्ट सिटी”चे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या सरकारने पुणेकरांना चांगल्या सुविधा देण्याऐवजी महागाई, कर आणि आता स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नव्या आर्थिक जाचात ढकलले आहे. अदानी समूहाच्या तिजोरी भरण्यासाठी लाखो वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरण (MSEB) मुख्य कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. “स्मार्ट मीटर हटवा, जनतेची लूट थांबवा”, “अदानीधार्जिणे सरकार हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनादरम्यान महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर सक्ती तात्काळ थांबवावी, ग्राहकांवर कोणतीही जबरदस्ती करू नये, तसेच वीज दरवाढीच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट रोखावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम)च्या अध्यक्षा श्रीमती दीप्तीताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल आणि जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!