
लाईट बंद करतो, काय करायचे ते करा ! अधिकाऱ्यांची अरेरावी
वीज समस्यांवर आवाज उठवणाऱ्या नागरिकांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
पुणे : हांडेवाडी परिसरातील वीज समस्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या ग्रामीण विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांशी अरेरावीची वागणूक केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्त्यांनी केला आहे. समस्यांचे निराकरण करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप होत असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हांडेवाडीच्या ग्रामीण भागातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढता वीजभार आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांनी त्रस्त आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रास्ता पेठ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित अधिकारी निलेश रासकर यांनी नागरिकांना जाब विचारत आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “आंदोलन करून नाटक करताय”, “लोकांची माथी भडकवताय”, “तीच तीच गोष्ट वारंवार सांगता” अशा शब्दांत नागरिकांचा अवमान करण्यात आला. एवढेच नव्हे तर “मुद्दाम तुमची लाईट बंद करतो, काय करायचे ते करा”, “५० तासांचा शटडाऊन घ्या, नाहीतर तोंड बंद ठेवा” तसेच “तुम्हाला काय करतो ते दाखवतो” अशा धमकीवजा भाषेचाही वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांच्या मते, शहरातील महावितरण अधिकारी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करत असताना ग्रामीण विभागात मात्र नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. समस्यांचे निराकरण करण्याऐवजी तक्रार करणाऱ्यांनाच लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
लोकशाही मार्गाने आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांशी अशा प्रकारची वागणूक देणे निषेधार्ह असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची प्रशासनाने हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत महावितरणच्या संबंधित अधिकारी निलेश रासकर यांना संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही .

