
हडपसर-मांजरीत विनापरवाना रस्ते खोदाईचा धक्कादायक प्रकार!
# हडपसर-मांजरीत विनापरवाना रस्ते खोदाईचा धक्कादायक प्रकार!
### १५ दिवसांपासून मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि पदपथांवर खोदकाम; बॅरिकेडिंग नाही, सुरक्षेच्या उपाययोजनाही नाहीत!
### तोंडी परवानगीचा ठेकेदाराचा दावा; पथ विभाग म्हणतो, कोणतीही परवानगी दिलेली नाही!
### ठेकेदारावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची हडपसर नागरी कृती समितीची मागणी
**हडपसर :** पुणे महापालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील हडपसर गावठाण, मांजरी, साडेसतरा नळी, मुंढवा, ससाणेनगर आणि काळे बोराटेनगर परिसरात गेल्या १५ दिवसांपासून मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच पदपथांवर मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. मात्र, या कामाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेडिंग, सूचना फलक, सुरक्षित मार्ग आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवितसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी थेट पादचारी मार्गच खोदण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
**महापालिकेच्या विभागांकडून परस्परविरोधी माहिती!**
या खोदाईबाबत हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता **प्रवीण कळमकर** आणि अभियंता **प्रतीक दळवी** यांच्याशी संपर्क साधला असता, सदर काम मुख्य खात्यामार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्य खात्याच्या पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता **विजय पाटील** यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करून गुन्हा नोंदविण्याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.
**ठेकेदाराचा तोंडी परवानगीचा दावा; लेखी परवानगी मात्र नाही!**
दुसरीकडे, संबंधित ठेकेदाराचे अधिकारी सातपुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दिवसभर फोनला प्रतिसाद दिला नाही. मात्र, आज सकाळी संपर्क साधल्यानंतर पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्याच्या पुष्टीसाठी लेखी परवानगी मागितली असता ती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. काही अडचण असल्यास हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे उत्तरही त्यांनी दिले.
**तोंडी परवानगी की लेखी आदेश? नेमके सत्य काय?**
रस्ते खोदाईसाठी नियमानुसार पूर्वपरवानगी घेणे, आवश्यक शुल्क भरणे, कामाचा कालावधी निश्चित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष खोदाई सुरू होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदाराकडे लेखी परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, तोंडी परवानगी मिळाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकी प्रशासकीय प्रक्रिया काय राबविण्यात आली, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
**ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; दंडात्मक कारवाई करा!**
या संपूर्ण प्रकरणाची हडपसर नागरी कृती समितीने गंभीर दखल घेतली आहे. विनापरवाना रस्ते खोदाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, नियमानुसार कठोर कारवाई करावी तसेच दंड आकारण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांकडेही लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खोदाईसाठी परवानगी देण्यात आली होती की नाही, तोंडी परवानगीचा दावा कितपत सत्य आहे, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती आणि सुरक्षा नियमांचे पालन का करण्यात आले नाही, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी समितीची भूमिका आहे.
**महापालिका नेमकी कोणाची जबाबदारी निश्चित करणार?**
एकीकडे पथ विभागाकडून परवानगी नसल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे ठेकेदाराकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी परवानगीचा दावा केला जात आहे. मग लेखी आदेशाशिवाय खोदाई सुरू कशी झाली? गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या कामाची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही का? नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग आणि सूचना फलक लावण्याची जबाबदारी कोणाची? तसेच पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली असेल, तर त्यानंतर प्रत्यक्ष कोणती कारवाई झाली?
रस्ते खोदाई करण्यापूर्वी परवानगी घेणे, महापालिकेची निर्धारित कार्यपद्धती (SOP) पाळणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही मूलभूत जबाबदारी आहे. मग या प्रकरणात नियमांचे पालन झाले का? महापालिकेची यंत्रणा नेमकी कोणाची जबाबदारी निश्चित करणार?
**सार्वजनिक रस्ते हे कोणाच्याही मनमानीचे कुरण नाहीत. नागरिकांच्या जीवितसुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी हडपसर नागरी कृती समितीने केली आहे.**

