
दारू प्रकरणानंतर एफडीएची मोठी कारवाई; ५,९२९ किलो मेथेनॉल जप्त
मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारू पिऊन १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत भिवंडीतील एका कंपनीवर धाड टाकून तब्बल ५,९२९ किलो मेथेनॉलचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात संबंधित गाळे सील करण्यात आले असून कंपनीच्या मालकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात गावठी दारूमध्ये मेथेनॉल मिसळल्याने मृत्यूंचे तांडव घडल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाने मेथेनॉलच्या पुरवठा साखळीचा शोध सुरू केला होता.
तपासादरम्यान भिवंडीतील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीकडून मेथेनॉलचा पुरवठा झाल्याचे समोर आले. त्यानंतर एफडीएच्या पथकाने कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. कारवाईदरम्यान ५,९२९ किलो मेथेनॉलचा साठा आढळून आला. मात्र या साठ्याबाबत कोणतीही नोंद, खरेदी-विक्रीचा तपशील किंवा साठा नोंदवही उपलब्ध नव्हती. त्यामुळे संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणात कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक अरुणकुमार चौबे यांच्याविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल. अन्न व औषधांच्या क्षेत्रातील बेकायदेशीर व्यवहार, भेसळ आणि अवैध उत्पादनांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी अवैध औषध विक्री, भेसळ किंवा संशयास्पद रसायन साठवणुकीबाबत तात्काळ एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींची गोपनीयता राखून तातडीने कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

