प्रियकरासह चौघांनी हॉटेलमध्ये आणि कारमध्ये तरुणीवर केला बलात्कार

हडपसर.
पुण्यात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या प्रियकराने हॉटेलमध्ये आणि कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने मित्रांना बोलावून घेतले आणि चौघांनी पीडितेवर बलात्कार केला.
या प्रकरणात ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिच्या प्रियकरासह चौघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंबईच्या हद्दीत झाल्याने गुन्हा मुंबई पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटक राज्यातील असून, ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करते. सन २०२१ मध्ये तिची आरोपीशी समाजमाध्यमातून ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला जाळ्यात ओढले.
लग्न आणि प्रेमाचे आमिषाने तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली. दोघेही तिथेच एका हॉटेलमध्ये राहिले. या वेळी आरोपीने पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी कारने पीडितेला पुण्याकडे घेऊन निघाला. या दरम्यान आरोपी आणि त्याच्या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केला.
आरोपी एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी तरुणीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेकडून तब्बल २८ लाख रुपये उकळले. ही रक्कम देण्यासाठी पीडित तरुणीने कर्ज घेतले होते.
आरोपीने पीडितेकडून दोन महागडे मोबाइलदेखील घेतले. आरोपी आणि त्याच्या मित्रांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडितेने काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा कांदिवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.