फ्लॅटमध्ये आढळल्या तब्बल 300 मांजरी

रेबीज लसीकरण, नसबंदी न केलेल्या मांजरींमुळे अख्खी सोसायटी परेशान; पुण्यातील विचित्र घटना
रेबीज लसीकरण, नसबंदी न केलेल्या मांजरींमुळे अख्खी सोसायटी परेशान; पुण्यातील विचित्र घटना….
पुण्यातील हडपसर भागातील मार्वल बाऊण्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सोसायटीतील सी-901 या 3 BHK फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या बहिणींनी 300 हून अधिक मांजरी पाळल्याची बाब समोर आली आहे. सदर सभासदाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी का पाळल्या? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोसायटीतील रहिवाशी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हडपसर पोलिस आणि पुणे जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटधारकांनी सुरुवातीला सहकार्य करण्यास नकार दिला, मात्र दोन तासांच्या विनंतीनंतर त्यांनी दरवाजा उघडला. तपासणीदरम्यान 3 बीएचके फ्लॅटमध्ये 300 पेक्षा जास्त मांजरी आढळल्या, त्यापैकी काही गर्भवती तर काहींना पिल्लेही होती.
पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या माहितीनुसार, या मांजरींचे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड ठेवण्यात आलेले नाही. एकाही मांजरीचे रेबीज लसीकरण किंवा नसबंदी करण्यात आलेली नाही. फ्लॅटमध्ये मांजरांच्या विष्ठेमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. काही मांजरींना दुखापतही झाल्याचे आढळून आले.
48 तासांत मांजरी अन्यत्र हलवण्याच्या सूचना
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटधारकांना पुढील 48 तासांत सर्व मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची योग्य देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाने सोसायटीतील इतर रहिवाशांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, सोसायटीतील इतर फ्लॅट धारकांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, मांजरांमुळे सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी हे मांजर मोठा गोंगाट करतात. विशेषतः त्यांच्या वास्तव्यामुळे सोसायटीत उग्र दर्पही पसरला आहे.
महापालिका आणि पोलिसांत तक्रार दाखल
रहिवाशांनी 2020 मध्येच या प्रकरणी पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा 350 वर पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. या मांजरांमुळे काही आजार पसरण्याची भीती असल्यामुळे या प्रकरणी त्वरित योग्य ती कारवाई करा, अशी विनंती रहिवाशी यासंबंधी पालिका प्रशासनाला केली आहे.