इच्छुकांनी लागा तयारीला: महापालिका निवडणुका होणार या महिन्यात

पुणे : राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागणी केलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती राज्य सरकारकडून सादर करण्यात आली आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले की आमची तयारी असून तातडीने निवडणुका घेऊ, असे महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी स्पष्ट केले. एप्रिल महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यताही त्यांनी या वेळी बोलून दाखविली.

भाजपच्या संघटन पर्व मेळाव्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्यातील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल.

तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे. विधानसभेत महायुतीने २३७जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयो होईल.”

मुंडे प्रकरणावर चुप्पी
■ ‘बीड प्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, हा मुंडे, अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही,’ असे सांगून बावनकुळे यांनी या प्रश्नावर अधिक बोलण्यास नकार दिला
