चोरट्याकडून तब्बल २५ दुचाकी जप्त…

.
पुणे :
वाहन चोरीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याने पुण्यातील विविध भागांतून चोरलेल्या २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीच्या गुन्ह्यात पाच महिन्यांपूर्वी त्याला जामीन मिळाला होता. कारागृहातून बाहेर पडताच त्याने पुन्हा दुचाकी चोरी सुरू केली होती.

शंकर भरत देवकुळे (वय ३२, रा. उरुळी देवाची) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पर्वती भागातून एक दुचाकी चोरीला गेली होती. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते याचा तपास करत होते. तपासात त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.

त्यातून त्यांना देवकुळे याने दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून त्याला इचलकरंजी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

दुचाकी चोरी केल्यानंतर तो वाहन क्रमांकाच्या पाट्या काढून टाकायचा. त्यानंतर दुचाकी त्याचा ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनील कुदळे (वय २७, रा. खडकी, ता. दौंड) याला नेऊन द्यायचा. कुदळे त्याच्या गॅरेजमधून जुन्या दुचाकींची विक्री करायचा. वित्तीय संस्थेचे हप्ते थकल्याने दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी बतावणी कुदळे करायचा.

देवकुळेने तुळजापूरमधील मित्राकडे दोन दुचाकी ठेवण्यास दिल्या होत्या. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरलेल्या १८ दुचाकी मालकांचा शोध लागला असून, उर्वरित मालकांचा शोध घेण्यात येत आहे. दौंड परिसरातील शेतकऱ्यांना कुदळेने स्वस्तात दुचाकींची विक्री केल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, सहाय्यक फौजदार मधुकर तुपसौंदर, पोलिस कर्मचारी शंकर वाकसे, संजीव कळंबे, सुजित पवार यांनी ही कामगिरी केली.