पोलिसांनी नऊ किलो गांजा केला काळा खडक आणि निगडीमध्ये जप्त
पिंपरी- चिंचवड : शहरामध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे नऊ किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवड शहरात गांजा विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर आहे. याच अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी नऊ किलो गांजा जप्त केला आहे. सूरज पंडित पवार, हफिजअली मेहबुबअली सय्यद आणि मोहिनी आनंद जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक येथे अंमली पदार्थ विरोधी पथक हे गस्त घालत होत. पथकातील पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांना माहिती मिळाली की दोन संशयित सुरज पंडित पवार आणि हफिजअली मेहबूबअली यांच्याकडे गांजा आहे. त्यांना ताब्यात घेऊन सुरज च्या घरी तीन किलो ७२२ ग्रॅम गांजा पोलिसांना आढळला. दोन मोबाईल देखील मिळाले.
दुसऱ्या कारवाईमध्ये निगडीत दत्त मंदिराच्या परिसरात शौचालयाच्या आडोशाला संशयितरित्या मोहिनी जाधव ही महिला थांबली होती. मोहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोहिनीच्या घरी देखील चार किलो गांजा पोलिसांना मिळाला. दोन्ही कारवाई मध्ये सुमारे नऊ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.