
काळे बोराटे नगर ते शिवनेरी नगर रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगचा विळखा!
दोन्ही बाजूंना वाहने उभी; नागरिकांची कोंडी, अग्निशमन दलाची गाडीही अडकण्याची शक्यता
हडपसर : काळे बोराटे नगर ते शिवनेरी नगर या रस्त्यावर बेकायदेशीर आणि विनापरवाना वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वाहनचालकांना आपली गाडी घेऊन जाण्यासाठी पुरेशी जागाही शिल्लक राहत नाही.
विशेष म्हणजे, या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अचानक आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार का, असा गंभीर सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
या समस्येबाबत हडपसर नागरी कृती समितीच्या वतीने काळेपडळ वाहतूक विभागाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. मात्र, निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित रस्त्याची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
आता वाहतूक पोलिसांच्या पाहणीनंतर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार? रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग हटवून नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार का? याकडे काळे बोराटे नगर आणि शिवनेरी नगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

