
महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी कायमस्वरूपी जिना, मेघडंबरी उभारण्याची मागणी
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्तांना निवेदन
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी कायमस्वरूपी पक्का जिना उभारावा, तसेच पुतळ्यावर आकर्षक मेघडंबरी उभारण्यात यावी, अशी मागणी फुलेप्रेमींनी केली आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिक येत असतात. मात्र, पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी कायमस्वरूपी जिन्याची व्यवस्था नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुतळ्यापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी सुरक्षित व मजबूत जिना उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच पुतळ्याच्या वरच्या बाजूस मेघडंबरी उभारल्यास पुतळ्याचे ऊन-पावसापासून संरक्षण होण्यास मदत होईल. या दोन्ही कामांमुळे महात्मा फुले यांच्या स्मारकाला अधिक सन्मानजनक स्वरूप प्राप्त होईल, अशी भूमिका फुलेप्रेमींनी मांडली आहे.
महात्मा फुले यांची २०० वी जयंती जवळ येत असल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनाने या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना २५ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी निवेदन देण्यात आले. जयंतीपूर्वी ही कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा नितीन बोराटे,मारुती भुजबळ , अशोक कुदळे, गणेश वाडकर, बंडू कचरे, सुधीर टिळेकर,अमोल राजमाने, डॉ. गौतम बेंगाळे राखी रासकर , राजेंद्र म्हेत्रे, धनंजय झुरुंगे या फुलेप्रेमींनी व्यक्त केली आहे.

