
१० गुन्हे दाखल असलेल्या अट्टल फरार आरोपीला पुण्यातून अटक
शिक्रापूर ,
घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. दीपक बाळासाहेब ऊर्फ बाळू ढेरंगे (वय ३७, रा.कोरेगाव भीमा, ता.शिरूर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल आहेत.
कोरेगाव भीमा येथील किरण पंडित ढेरंगे हे १८ जुलै २०२६ रोजी कुटुंबीयांसह घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे धनंजय दत्तात्रय घोडके याला यापूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. मात्र, या प्रकरणातील दीपक ढेरंगे हा तेव्हापासून फरार होता. पोलिसांना गुंगारा देत असलेल्या ढेरंगेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते.
दरम्यान, तो पुण्यात येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शिक्रापूरसह लोणीकंद, लोणी काळभोर, सिंहगड रोड, चंदननगर, संगमनेर आणि रांजणगाव पोलीस ठाण्यांत दरोडा, खंडणी, मारहाण, अपहरण आणि शस्त्र कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांची नोंद आहे. एका प्रकरणात मोक्कानुसारही कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि पथकातील रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे करीत आहेत.

