शौर्य पथक अन् पारंपरिक वाद्यांनी हडपसरची विसर्जन मिरवणूक दुमदुमली

शौर्य पथक अन् पारंपरिक वाद्यांनी हडपसरची विसर्जन मिरवणूक दुमदुमली

हडपसर : गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने, शिस्तबद्ध आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी कशी असावी, याचा आदर्श हडपसर पोलिसांनी सोमवारी (दि. २१) घालून दिला. हडपसर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आदर्श गणपती विसर्जन मिरवणुकीत शंखनाद, शौर्य पथक, ढोल-ताशे, तुतारी आणि सनईच्या पारंपरिक वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते केशव शंखनाद पथकाचे सामूहिक शंखनाद सादरीकरण. हडपसर पोलिसांच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या या पथकाने एकसुरात शंखनाद करत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. शंखनादाच्या निनादाने मिरवणुकीत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

केशव शंखनाद पथकाच्या सादरीकरणाची दिनेश बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विश्वविक्रम म्हणून नोंद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या वतीने या पथकाला आमंत्रित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

शंखनादाचे धार्मिक महत्त्व, भारतीय संस्कृतीतील त्याचे स्थान तसेच शंखनादाशी संबंधित आरोग्यविषयक बाबींची माहिती नागरिकांना देण्यात आली. पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन करत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मिरवणुकीतील महिला शौर्य पथकाचे सादरीकरण हे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले. महिलांनी विविध शौर्यकौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर करून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ढोल-ताशांच्या गजरात शौर्य पथकाच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीतील उत्साहाला आणखी उधाण आले.

महाराष्ट्रीयन पारंपरिक पेहराव, शंखनादाचा घुमणारा आवाज, ढोल-ताशांचा गजर, तुतारीचे निनाद आणि सनईचे मंगल सूर यामुळे हडपसर परिसरातील वातावरण भारावून गेले होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा, शिस्त आणि सामाजिक संदेश यांचा संगम घडवत हडपसर पोलिसांनी आदर्श विसर्जन मिरवणुकीचे दर्शन नागरिकांना घडविले

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!