उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

हडपसर : हडपसर-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ उड्डाणपुलावर सोमवारी (दि. २१) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश वाघमोडे (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गणेश वाघमोडे हे भेकराईनगर येथून मगरपट्टा परिसरात कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. गाडीतळ उड्डाणपुलावरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर मागून येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तातडीने रुग्णवाहिका आणि हडपसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मृत गणेश वाघमोडे हे मूळचे काळेवाडी, माण-खटाव, जिल्हा सातारा येथील रहिवासी होते. सध्या ते फुरसुंगी येथील भोसलेनगर परिसरात राहत होते. मगरपट्टा येथे कामानिमित्त जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!