मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; १४ लाखांचा साऊंड सिस्टिमसह ट्रक जप्त

मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; १४ लाखांचा साऊंड सिस्टिमसह ट्रक जप्त

हडपसर : गणपती स्थापना मिरवणुकीत मोठ्या क्षमतेच्या प्लाझ्मा स्पीकरचा वापर करून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालकावर काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सुमारे १४ लाख रुपये किमतीचा डीजे साऊंड सिस्टिमसह ट्रक जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३५ वाजण्याच्या सुमारास शेल पेट्रोल पंपाजवळ, शंभू कॉलनी, महम्मदवाडी येथे मोठ्या आवाजात कर्णकर्कश आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती काळेपडळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार संजय देसाई व अमोल फडतरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने साऊंड सिस्टिमची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञाला बोलावले. तपासणीदरम्यान संबंधित डीजे सिस्टिममध्ये मोठ्या क्षमतेच्या प्लाझ्मा साऊंड सिस्टिमचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून साऊंड सिस्टिम जप्त केली.

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या प्लाझ्मा ध्वनीक्षेपण यंत्रणेचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख रुपये किमतीचा टाटा ७०९ ट्रक तसेच सुमारे ७ लाख रुपये किमतीची दोन बेस, दोन टॉप व साऊंड मिक्सर मशीन असलेली डीजे सिस्टिम, असा एकूण १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बैनीवाल, परिमंडळ-६ चे पोलीस उपआयुक्त, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निबांळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप राजपूत, पोलीस हवालदार संजय देसाई व अमोल फडतरे यांनी केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!