ससाणेनगर आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा अद्याप प्रलंबित

ससाणेनगर आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा अद्याप प्रलंबित

दोन महिन्यांपूर्वी लेखी तक्रार; संबंधित विभागाकडून कार्यवाहीची प्रतीक्षा

हडपसर : हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मधील ससाणेनगर येथील महात्मा फुले क्रीडा संकुलातील आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. हे आरोग्य केंद्र सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू झाले असून, सध्या येथे कार्यरत कर्मचारी पिण्यासाठी बाहेरून पाणी विकत घेत असल्याची माहिती स्थानिक नागरिक स्वप्नील डांगमाळी यांनी दिली.

आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या या ठिकाणी अशी कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात सुमारे दोन महिन्यांपूर्वी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. तक्रार करून ६० दिवसांचा कालावधी उलटला असून, अद्याप पाणीपुरवठ्याची व्यवस्था झालेली नसल्याची माहिती डांगमाळी यांनी दिली. गेल्या आठवड्यातही त्यांनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील भवन विभागाचे मुकादम काळे यांच्याकडे याबाबत पुन्हा तक्रार केली आहे.

दरम्यान, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या एकात्मिक आरोग्य वर्धिनी बैठकीत परिसरातील आरोग्य केंद्रांमधील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली होती. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर ससाणेनगर आरोग्य केंद्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील संबंधित विभागाकडून कधी सोडवली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने या ठिकाणी पाहणी करून पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तसेच, याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवर कार्यवाहीची सद्यस्थिती स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

“आरोग्य केंद्र सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. याबाबत तक्रार करूनही अद्याप सुविधा झालेली नाही. संबंधित विभागाने हा प्रश्न लवकर मार्गी लावावा,” अशी मागणी स्थानिक नागरिक स्वप्नील डांगमाळी यांनी केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!