
मगरपट्ट्यात ‘माय मराठी कट्टा’ची मंगळागौर रंगली
पुणे : श्रावणातील मंगळागौरीची परंपरा जपत रेवती जाधव यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली ‘माय मराठी कट्टा’तर्फे मगरपट्टा येथे मंगळागौर पूजन व पारंपरिक खेळांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पूजा नितीन शिंदे, सुनीता गायकवाड, नलिनी गोडसे, विद्या खाडे, आरती जाधव, रुचा राणे, राही करंजे, वर्षा प्रभू, कांचन व प्रणिता वाणी यांनी सहकार्य केले.
मंगळागौर पूजनानंतर श्रावणातील परंपरांवर आधारित नाटक व नृत्य सादर करण्यात आले. फुगडी, झिम्मा, पिंगा, आगोटा-पागोटा यांसह विविध पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली. नऊवारी, पैठणी आणि मराठमोळ्या वेशभूषेतील विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मराठी संस्कृती व मंगळागौरीच्या परंपरा जपणे आणि महिलांना एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हा उपक्रमाचा उद्देश होता. पारंपरिक खेळांनंतर मराठमोळ्या भोजनाचा आस्वाद घेत महिलांनी स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोहळ्याच्या यशाची पावती ठरला.

