औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द करण्यात आली असली, तरी परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. परीक्षेतील कथित अनियमितता आणि गैरप्रकारांबाबत आयोगाकडे तक्रारी तसेच पुरावे सादर करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत अखेर परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, केवळ परीक्षा रद्द करून प्रश्न संपत नसून, गैरप्रकारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करून कारवाई करावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.

आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी

आयोगाच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. विविध स्पर्धा परीक्षांबाबतही गैरप्रकारांच्या तक्रारी करण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभा

मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल आणि संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी शासनाने आणि आयोगाने प्रभावी पावले उचलावीत, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

राजकीय नेत्यांचा सहभाग

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेबूब शेख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!