
वारंवार दुरुस्तीला ‘ब्रेक’ कधी? सय्यदनगर रस्त्याच्या कामाचे ऑडिट करा
हडपसर : हडपसर ते महमंद वाडी रस्त्यावरील सय्यदनगर ते रामटेकडी रस्त्यादरम्यान पावसाळी वाहिनी आणि रस्ता दुरुस्तीच्या कामांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी दुरुस्ती केलेल्या रस्त्यावर पुन्हा समस्या निर्माण झाल्याने “वारंवार दुरुस्तीला ‘ब्रेक’ कधी?” असा सवाल उपस्थित झाला आहे. या संपूर्ण कामाचे स्वतंत्र परीक्षण करून ऑडिट अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आशिष काळे यांनी पुणे महापालिकेकडे केली आहे.
पावसाळी वाहिनीचे काम झाल्यानंतर परिसरातील काही चेंबरची वारंवार दुरुस्ती करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ता, चेंबर आणि पावसाळी वाहिनीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामासाठी झालेला खर्च, प्रत्यक्ष कामाचा दर्जा आणि त्याची टिकाऊपणा यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
आशिष काळे यांची भूमिका :
“महापालिकेने केवळ दुरुस्ती करून विषय संपवू नये. संपूर्ण कामाचे प्रत्यक्ष परीक्षण करून खर्च व कामाच्या नोंदी तपासाव्यात आणि ऑडिट अहवाल नागरिकांसमोर जाहीर करावा. वारंवार दुरुस्तीची वेळ का येते, याची तांत्रिक कारणे शोधून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी,” अशी मागणी काळे यांनी केली.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी
सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामांचा दर्जा आणि टिकाऊपणा याबाबत प्रशासनाने पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. चौकशीत कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करून कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही काळे यांनी केली.
दरम्यान, काही नागरिकांनी या कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाली असण्याची शक्यता व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अधिकृत चौकशीचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
नागरिकांना दर्जेदार रस्ता आणि सक्षम पावसाळी जलनिस्सारण व्यवस्था मिळणे हा मूलभूत प्रश्न असल्याचे काळे यांनी सांगितले. त्यामुळे कामाची गुणवत्ता, खर्च आणि जबाबदारी याबाबत महापालिकेने स्पष्ट माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर आणि संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून कामाचे परीक्षण करावे तसेच ऑडिट अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

