चौफुला-बोरीपार्धी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

चौफुला-बोरीपार्धी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

५० कोटींच्या पॅकेजमध्ये ११ रस्त्यांचा समावेश; कोअर कटिंगसह स्वतंत्र तपासणीची मागणी

दौंड : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी सुमारे ५० कोटी ४२ लाख ६० हजार ७९९ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये चौफुला-बोरीपार्धी-बोरमलनाथ मंदिर ते रेल्वे गेट या महत्त्वाच्या रस्त्याचाही समावेश आहे. मात्र, सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने संपूर्ण कामाची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी अनिल बापूसाहेब नेवसे यांनी केली आहे.

पॅकेज क्रमांक आरडी-पुणे ए-१९९ अंतर्गत एकूण ११ रस्त्यांच्या सुधारणा कामांचा समावेश आहे. आदेशपत्रानुसार निविदेची किंमत ४८ कोटी ४ लाख ३१ हजार ४०२ रुपये, तर स्वीकृत रक्कम ५० कोटी ४२ लाख ६० हजार ७९९ रुपये (४.९६ टक्के अधिक) आहे. संबंधित कामाची मुदत १५ ऑक्टोबर २०२४ ते १४ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. काम पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर असल्याचे आदेशपत्रात नमूद आहे.

या पॅकेजमध्ये उरुळीकांचन-दळिंब, राष्ट्रीय महामार्ग ६५ ते बोरमलनाथ मंदिर-बोरीपार्धी, दहिताणे-पिलाणेवाडी, देवकरवाडी-मेमणेवाडी, स्वामी चिंचोली-निंबोडी, देऊळगाव गाडा-दत्तवाडी, राहू-शिरसाई, मासनेरवाडी-वागदरा, राहू-टाकळी, नागाव-शिवरोड-दापोडी आणि बोरीपार्धी-दापोडी-लवणगारे वस्ती या रस्त्यांचा समावेश आहे.

रस्त्याच्या कामातील प्रत्येक थराची जाडी, वापरलेले साहित्य, डांबराचे प्रमाण आणि मजबुती यांची तांत्रिक तपासणी करावी. केवळ कागदोपत्री तपासणी न करता कोअर कटिंग करून नमुने प्रयोगशाळेत तपासावेत, तसेच स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नेवसे यांनी केली आहे.

“सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च होत असताना रस्त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. निकृष्ट काम आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहू नये,” अशी भूमिका नेवसे यांनी मांडली.

दरम्यान, या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणा कधी करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!