वारंवार वाहतूक कोंडी; नागरिकांचा सवाल—कोंडीचा प्रश्न सुटणार कधी?

वारंवार वाहतूक कोंडी; नागरिकांचा सवाल—कोंडीचा प्रश्न सुटणार कधी?

दौंड : शिरूरसातारा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौफुला चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौफुला चौकातून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूक, स्थानिक वाहनांची वर्दळ तसेच चौकातील विविध दिशांना जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होते. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या समस्येबाबत वाहतूक पोलिसांना वारंवार माहिती देण्यात आली आहे. तसेच माध्यमांमधूनही चौफुला चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही या चौकात नियमितपणे वाहतूक पोलिसांची नियुक्ती होत नसल्याने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

चौफुला चौकाचे वाढते महत्त्व आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केवळ अधूनमधून पोलिसांची उपस्थिती न ठेवता, कायमस्वरूपी वाहतूक नियमनाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतूक कोंडीमुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? चौफुला चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासन ठोस निर्णय कधी घेणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

– चौफुला चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.
– सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत विशेष वाहतूक नियमन करावे.
– चौकातील वाहतुकीचा प्रत्यक्ष सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.
– वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करावी.
– भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन चौकासाठी कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!