कला-क्रीडा संस्कृतीच्या वृद्धीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट होईल : शकुंतला खटावकर

कला-क्रीडा संस्कृतीच्या वृद्धीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट होईल : शकुंतला खटावकर

हडपसर:
आपल्या देशाला कला आणि क्रीडा संस्कृतीची महान परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत झाल्यास देशाची राष्ट्रीय एकात्मता आणखी बळकट होईल, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कारप्राप्त महिला कबड्डीपटू श्रीमती शकुंतला खटावकर यांनी केले.

सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहमेळाव्यात कृष्णा-कोयनामाई पुरस्कार स्वीकारताना त्या बोलत होत्या. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की, दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारताना कृष्णा-कोयना या नद्यांची गंगा-यमुनेशी एकरूपता झाल्याची भावना मनात जागृत झाली. आपल्या मातृभूमीच्या संस्कृतीशी जोडले जाणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

समारंभाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यासह शिक्षण, सामाजिक कार्य आणि कलेच्या क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे संपूर्ण भारत देशासाठी मोठे योगदान आहे. श्रीनिवास पाटील हे आपल्या पिढीतील बोलते साहित्यिक आणि सृजनशील प्रशासक आहेत. सातारा जिल्हा मित्र मंडळाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने मंडळाचाच गौरव झाला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस शौर्य पुरस्काराने सन्मानित झालेले तुकाराम चव्हाण यांना यावेळी अजिंक्यतारा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या कणखर भूमीने दिलेली प्रकृती आणि मानसिकतेमुळेच आपण खंबीरपणे भारत देशाची सेवा करू शकलो. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांइतकाच आनंद सातारा जिल्हा मित्र मंडळाने आईच्या मायेने दिलेल्या अजिंक्यतारा पुरस्कारामुळे झाला आहे.

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित माजी जिल्हाधिकारी, माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यापासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत तसेच सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातारा जिल्ह्याने मोठे कार्य केले आहे. जन्मभूमीइतकीच कर्मभूमी पवित्र मानणाऱ्या देशप्रेमी सातारा जिल्ह्याचा मला अभिमान आहे. या पुरस्कारामुळे समाजसेवा करण्याची प्रेरणा अधिक बळकट झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी विकास थोरात, रवींद्र कदम आणि राजेंद्र अडसूळ यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अण्णा साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा अडसूळ यांनी आभार मानले, तर संदीप साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : उजवीकडून विकास थोरात, डॉ. राजेंद्र झेंडे, उषा अडसूळ, अण्णा साळुंखे, श्रीनिवास पाटील, श्रीकांत देशमुख, तुकाराम चव्हाण, शकुंतला खटावकर, भीमराव भोगले आणि रवींद्र कदम.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!