
महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेनेचा जनआक्रोश
निकृष्ट रस्ते, दूषित पाणी, कचरा, भरतीतील कथित अनियमिततेवर प्रशासनाला धारेवर; दोषींवर कारवाईची मागणी
पुणे,
पुणे महानगरपालिकेच्या कथित निष्क्रिय आणि जनविरोधी कारभाराविरोधात शिवसेनेच्या वतीने गुरुवारी महापालिकेसमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे आणि महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान पहिल्याच पावसात उखडलेले रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढता कचऱ्याचा प्रश्न, शिक्षण विभागातील गहाळ फाईल, भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, पीएमपीएमएलमधील कथित गैरव्यवहार, एलईडी साहित्य चोरी, स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधा तसेच घनकचरा विभागाच्या निर्णयांबाबत महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात अधिकाऱ्यांना नोटांचे हार अर्पण करून निषेध नोंदविला. यापूर्वीच्या आंदोलनानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत, पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांची माहिती मागितल्यानंतर “माहिती उपलब्ध नाही” असे उत्तर मिळाल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही टीका करण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, सार्वजनिक निधीचा पारदर्शक हिशेब देणे आणि पुणेकरांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आंदोलनात पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शहरातील पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

