
पुणे पेठ परिसरात २१ हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई
अतिक्रमण निर्मूलन विभागाची धडक मोहीम; नागरिकांना बेकायदा बांधकाम न करण्याचे आवाहन
पुणे,
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने पुणे पेठ व खडकी पेठ परिसरात धडक कारवाई करत सुमारे २१ हजार ८०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईवेळी बांधकाम विकास विभागाचे सहशहर अभियंता मंगेश गावडे, उपअभियंता विवेक डुंबळे, कनिष्ठ अभियंता संतोष लांजेकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान २ जेसीबी, १ ब्रेकर मशीन, ७ पोलीस अधिकारी, ९ पोलीस कर्मचारी, २ एसआरपीएफ जवान, ६ जीवनी पथक कर्मचारी, २ रेस्क्यू कर्मचारी आणि १५ मजूर यांचा सहभाग होता.
उपआयुक्त सोमनाथ बनकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, महापालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम करू नये. परवानगीशिवाय उभारण्यात आलेले बांधकाम आढळल्यास त्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

