अर्धवट दुभाजकाचा मृत्यूचा सापळा! एका दिवसात दोन भीषण अपघात

अर्धवट दुभाजकाचा मृत्यूचा सापळा! एका दिवसात दोन भीषण अपघात

हडपसर,
ससाणे नगर–हडपसर मार्गावरील सिद्धिविनायक अंगण ते प्रतिभा रेसिडेन्सी हा अवघा काहीशे मीटरचा टप्पा नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. रेल्वे गेट ते कॅनलपर्यंत रस्त्याला दुभाजक असताना केवळ याच भागात दुभाजक नसल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात घडत आहेत. गुरुवारी अवघ्या काही तासांच्या अंतरात याच ठिकाणी दोन गंभीर अपघात घडल्याने पुणे महापालिकेच्या भोंगळ नियोजनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी एका दुचाकीस्वाराला अर्धवट असलेला दुभाजक न दिसल्याने तो थेट दुभाजकावर आदळला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

यानंतर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी भरधाव मोटार दुभाजकावर धडकली. या अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले असून, आतील प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, रेल्वे गेट ते कॅनलपर्यंत संपूर्ण दुभाजक असून फक्त सिद्धिविनायक अंगण ते प्रतिभा रेसिडेन्सी हा भाग दुभाजकाशिवाय आहे. त्यामुळे वाहनचालकांना अचानक रस्त्याची रचना बदलल्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होतात.

मोहित म्हस्के यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले, “एखाद्याचा जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. आम्ही नागरिक म्हणून पूर्णपणे हतबल झालो आहोत.”

डॉ. अविनाश पठारे यांनी या समस्येबाबत लेखी निवेदन देऊनही संबंधित प्रशासन आणि काळेपडळ वाहतूक विभागाने कोणतीही प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप केला आहे.

अर्जुन सातव यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, “ससाणे नगर–हडपसर रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरण नेमके का होत नाही? रस्ता रुंदीकरण, फुटपाथ आणि संपूर्ण दुभाजक या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. दररोज किमान पाच हजार वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचे झाले आहेत. ससाणे नगर रेल्वे उड्डाणपूलही अजून रखडलेला आहे. नागरिकांच्या जीवांची पर्वा कोणालाही नाही.”

समस्या

सिद्धिविनायक अंगण ते प्रतिभा रेसिडेन्सी दरम्यान दुभाजक अपूर्ण.

३० मीटर रस्ता रुंदीकरण वर्षानुवर्षे रखडले.

फुटपाथ नसल्याने पादचाऱ्यांनाही धोका.

दररोज सुमारे ५ हजार वाहनांची वर्दळ.

सतत वाहतूक कोंडी आणि अपघात.

ससाणे नगर रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पही प्रलंबित.

जबाबदारी नक्की कोणाची?

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, रस्ता रुंदीकरण, दुभाजक, वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? वारंवार लेखी तक्रारी करूनही पुणे महापालिका आणि संबंधित वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना न केल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आणखी एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

नागरिकांची मागणी

सिद्धिविनायक अंगण ते प्रतिभा रेसिडेन्सीपर्यंत तातडीने दुभाजक पूर्ण करावा.

ससाणे नगर–हडपसर रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरण तातडीने सुरू करावे.

दोन्ही बाजूंना सुरक्षित फुटपाथ उभारावेत.

आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर, चेतावणी फलक आणि प्रकाशयोजना करावी.

ससाणे नगर रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाला गती द्यावी.

अपघातप्रवण ठिकाण म्हणून या रस्त्याचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे.

तांत्रिक बाबी

रेल्वे गेट ते कॅनलपर्यंत दुभाजक असून मध्यभागीच दुभाजक खंडित आहे.

दुभाजक पूर्ण करण्यासाठी ३० मीटर रस्ता रुंदीकरण आवश्यक.

अपुरा रस्ता आणि वाहतुकीचा वाढता ताण यामुळे दुभाजकाचे काम रखडले आहे.

रात्रीच्या वेळी स्पष्ट रस्ता चिन्हे, रिफ्लेक्टर आणि प्रकाशयोजनेचा अभाव अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

दीपक गायकवाड, किरण कासट आणि उल्हास तुपे यांनी तातडीने रस्ता रुंदीकरण करून सिद्धिविनायक अंगण ते प्रतिभा रेसिडेन्सी दरम्यानचा दुभाजक पूर्ण करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की, प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आणखी एखादा निष्पाप नागरिक जीव गमावण्याची भीती नाकारता येणार नाही. विकासाच्या घोषणा करण्यापेक्षा नागरिकांचा जीव वाचविणे हेच प्रशासनाचे पहिले कर्तव्य आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!