
डॉमिनिकन रिपब्लिकमधील रिसॉर्टला भीषण आग; एका व्यक्तीचा मृत्यू
क्षणार्धात आगीने घेतला रौद्ररूप; जखमींवर उपचार सुरू, आगीच्या कारणाचा शोध सुरू
सांतो डोमिंगो (डॉमिनिकन रिपब्लिक) : डॉमिनिकन रिपब्लिकमधील प्रसिद्ध विवा विंडहॅम डॉमिनिकस बीच रिसॉर्ट येथे लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून सुमारे १,७०० पर्यटकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी चित्रीत केलेल्या व्हिडिओंमध्ये रिसॉर्टच्या अनेक भागांना आगीने वेढल्याचे दिसून येत आहे. उंचच उंच ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात झेपावत असल्याचे दृश्य पाहून पर्यटकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत जखमी झालेल्या अनेकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
रिसॉर्टमधील सर्व पाहुण्यांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. आगीमुळे रिसॉर्टच्या काही भागांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली आणि ती इतक्या वेगाने कशी पसरली याचा शोध स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाकडून घेतला जात आहे. प्राथमिक तपास सुरू असून सविस्तर अहवालानंतर आगीचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे डॉमिनिकन रिपब्लिकच्या पर्यटन क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

