
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले
पाच महिन्यांपासून सुरू असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात; दररोज १ हजार भाविकांना दर्शनाची संधी
भोरगिरी :
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले होत आहेत. मंदिर परिसरातील विकासकामे आणि भव्य सभामंडप उभारणीमुळे ९ जानेवारी २०२६ पासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले मंदिर १५ जून २०२६ पासून मर्यादित स्वरूपात भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
भाविकांची वाढती गर्दी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सभामंडप, पायऱ्या आणि इतर सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.
ऑनलाइन नोंदणी अनिवार्य
मंदिर व्यवस्थापन समितीने दर्शनासाठी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पूर्वनोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे.
नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून दर्शनावेळी वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल.
दररोज १ हजार भाविकांना प्रवेश
भाविकांची सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील सुरू असलेल्या कामांचा विचार करून प्रारंभी दररोज केवळ १ हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध राहणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.
दर्शनाची वेळ निश्चित
१५ जून ते ३० जून या कालावधीत दर्शनासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी पोलिस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने संयुक्त नियोजन केले आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
घोडेगाव पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन नोंदणीशिवाय मंदिर परिसरात गर्दी करू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- भाविकांनी घ्यावयाची काळजी
- ऑनलाइन नोंदणी अनिवार्य
- वैध ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक
- नोंदणीकृत पासधारकांनाच प्रवेश
- दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११
- दररोज केवळ १,००० भाविकांना प्रवेश
पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन पुन्हा सुरू होत असल्याने राज्यभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र मंदिर परिसरातील विकासकामे अद्याप सुरू असल्याने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दर्शनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने केले आहे.

