घरफोडी करणारे सराईत चोर १२ तासांत जेरबंद; २.२८ लाखांची रोकड जप्त

घरफोडी करणारे सराईत चोर १२ तासांत जेरबंद; २.२८ लाखांची रोकड जप्त

पुणे, घर बंद असल्याची संधी साधून बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील २ लाख २८ हजार १०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सायंकाळी फिर्यादी जेवणासाठी घर बंद करून बाहेर गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास परत आल्यानंतर घराचे कुलूप उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील कपाटे उघडी दिसत असल्याने त्यांनी तपासणी केली असता कपाटात ठेवलेली ३ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

तपासादरम्यान पोलिसांनी श्रेयस जहीर इदलाल (वय २५) आणि सामीर अनिस शेख (वय २०), दोघेही मोमीनपुरा, घोरपडे पेठ, पुणे येथील रहिवासी, यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील २ लाख २८ हजार १०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

यातील मुख्य आरोपी श्रेयस इदलाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली. तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुडळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपींना अटक केल्याने खडक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!