सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श; हरवलेले पैशांचे पाकीट परत

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श; हरवलेले पैशांचे पाकीट परत

पुणे,  समाजात प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेची अनेक उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. मात्र पुणे महानगरपालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या सचोटीची प्रचिती देत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

दि. ९ जून २०२६ रोजी पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी सुरेंद्र घडशी आणि सुरज कसबे यांना नियमित स्वच्छता कामकाजादरम्यान रस्त्यावर एक पैशांचे पाकीट सापडले. पाकिटात महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणताही मोह न बाळगता संबंधित नागरिक अशोक पतकी यांचा शोध घेतला आणि त्यांना ते पाकीट सुखरूप परत केले.

आपले हरवलेले पाकीट परत मिळाल्याने अशोक पतकी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र घडशी आणि कसबे यांनी कर्तव्य बजावल्याचे सांगत बक्षीस स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.

या घटनेमुळे दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या सचोटीमुळे केवळ प्रशासनाची प्रतिमा उंचावली नसून नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे.

“सार्वजनिक सेवेत असताना प्रामाणिकपणा हेच खरे बक्षीस आहे,” असा संदेश या घटनेतून मिळत असून, सुरेंद्र घडशी आणि सुरज कसबे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!