वानवडी पोलिसांनी कारवाई करत ४५ हजार रुपयांची दारू जप्त

पुणे : हडपसरमधील गोसावी वस्तीत मोठया प्रमाणावर हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी कारवाई करत ४५ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. या छाप्यात ३५ लिटरच्या १२ कॅनमध्ये भरलेली गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली.

सोमनाथ संजय कांबळे (वय ३०, रा. बिराजदारनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो ही दारू विक्री करत होता. रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलीस ठाण्याच्या सुरक्षानगर चौकीतील अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्तावर असताना पोलीस हवालदार रुपाली ताकवले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता पोलिसांनी गोसावी वस्तीत छापा टाकला.

तपासादरम्यान, कांबळेच्या नायलॉनच्या पोत्यातून गावठी हातभट्टी दारू आढळून आली. तसेच पत्र्याच्या शेडच्या मागील भागात बेटशीटच्या खाली मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली दारू सापडली. पोलिसांनी एकूण ४५ हजार ३५० रुपयांची दारू जप्त केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे तपास करीत आहे.
