लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष

ससाणेनगर कालव्यावरील जलवाहिनीतून पाणीगळती सुरू ………
ससाणे नगर मधील नागरिकांचा आरोप
पुणे, उन्हाची काहिली वाढल्याने पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती वाढली आहे. पाणीटंचाई नैसर्गिक नाही, तर पाणीपुरवठा विभागाच्या गचाळ कारभारामुळे पाणीटंचाई भासत आहे. व्हॉल्व्ह, जीर्ण जलवाहिन्या आणि अनेक ठिकाणच्या सार्वजनिक नळाला चाव्या नसल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

पाणीगळती विषयी नागरिकांनी तक्रार केली, तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याची तक्रार दिलीप गायकवाड , गणेश बोराटे,अविनाश काळे, सागर ससाणे यांनी सांगितले.

फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पालिका प्रशासन लगेच टँकरने पाणीपुरवठा करतो असे सांगून मोकळे होतात. मात्र, पाणीगळती विषयी गांभीर्याने का घेत नाहीत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना रस्त्यावर पाणी सांडते, टँकर भरणा केंद्रावर हजार लीटर पाणी वाया जात आहे,

व्हॉल्व्ह, जीर्ण जलवाहिनी दुरुस्त का करत नाही. पाणी वाचवा, जीव वाचवा असा गोड गोड संदेश देणारा पालिका प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जल है तो कल है अशी घोषवाक्य आता गुळगुळीत झाली आहेत, अशी टिपण्णी ससाणेनगरमधील सुरेश हडदरे यांनी केली आहे.

हडपसर मधील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल अगरवाल म्हणाले ससाणेनगर येथील कालव्य़ालगत जलवाहिन्या गेल्या आहेत. या जलवाहिनीमधून मागिल आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे, याविषयी हडपसर क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार केली. मात्र, प्रत्येकजण एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळा होत आहे. ही कामे आता नागरिकांनाच करावी लागणार आहेत.
दरम्यान लष्कर पाणी पुरवठा अधिकारी विलास मोराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.