ससाणेनगरची वाहतूक कोंडी कोण सोडवणार ?

हडपसर, ससाणे नगर रस्त्यावर रोज सकाळी ,सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. याकडे कोण पाहणार आहे का असा सवाल नागरिकांनी केला आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे,तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्य पदार्थ विकणारे हातगाड्या उभ्या असतात. ससाणे नगर भागात शाळांची संख्या मोठी आहे.

बँका ,हॉस्पिटल , व्यापारी संकुल जास्त असल्यामुळे अनेक नागरिकांना ससाणे नगर येथे यावेच लागते. पालिकेने पर्यायी रस्ते केलेले नाहीत. जे रस्ते उपलब्ध आहेत त्याचे रुंदीकरण देखील केलेले नाही. त्यामुळे सकाळी ९ ते १ सायंकाळी ५ ते ८ रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली असते.

पुणे मनपा ने १९९८ साली विकसित आराखड्यात हडपसर ससाणे नगर रस्ता २४ मीटर दाखविला आहे.परंतु प्रत्यक्षात मात्र हा वापरात नाही. रस्ता रुंदीकरण लांबले असून पुणे मनपा ,अधिकारी या कडे दुलक्ष करीत आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमानात होत असते त्यात रस्ता उखडल्याने अजून भर पडली आहे.

ससाणे नगर मुख्य रस्त्यावर अनेक वेळा मिरवणूक आयोजित करण्यात येते. जयंती , गणेशोत्सव, घटस्थापना , अश्या विविध दिवशी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. नवनाथ चौकातील वाहतूक नियंत्रण करणारे दिवे गेल्या १ वर्षापासून बंद अवस्थेत आहे.त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी पुणे शहर समता परिषद अध्यक्ष पंढरीनाथ बनकर यांनी केलेली आहे.