बँकांना आता वर्ग २ च्या जमीनीवर बोजा आकारता येणार

सातारा- शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. भोगवटा वर्ग २ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागते. अशा शेतकऱ्यांना कर्ज उपलन्ध व्हावे यासाठी भोगवटा वर्ग २ च्या जमीनींवर बँकांना कर्जाचा बोजा आकारण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून आता बँकांना वर्ग २ च्या जमीनीवर बोजा आकारत कोणत्याही प्रकारची अडचण नाही. दरम्यान, देवस्थान इनाम जमिनीबाबत कमिटी नेमण्यात आली असून त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ना. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा राज्यसभा खासदार नितीन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करु शकला नाही तर, बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगावटा वर्ग २ असेल तरी त्यावर बोजा चढविता येतो. फक्त देवस्थान इनाम जमिनी वर्ग ३ बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याबाबत कमिटी नेमण्यात आली असून त्यांच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देवस्थान जमिनीबाबत नेमण्यात आलेल्या कमिटीचा अहवाल लवकर घेण्यात यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तर पुनर्वसनाच्या शिक्क्यांबाबत योग्य निर्णय घेऊ असे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी बोजा चढविताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली.
